तळेगाव दाभाडे येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून चार जणांनी मिळून एका तरुणाचा खून केला. ही घटना रविवारी (ता. ५) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथील निलया सोसायटी समोर घडली.
कृष्णा शेळके (वय २०, रा. तळेगाव दाभाडे) असे मृताचे नाव आहे. तळेगाव दाभाडे पोलीस स्टशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा शेळके हा त्याच्या दोन मित्रांसोबत निलया सोसायटी समोर थांबला होता. त्यावेळी तिथे अनोळखी चार जण आले व कृष्णा याला इथे का थांबलास असे विचारले. त्यावरून त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. सुरुवातीला कृष्णा याने आरोपींना मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी कृष्णाला देखील मारहाण केली.
या मारहाणीमध्ये कृष्णाचा मृत्यू झाला. या संदर्भातील तक्रार कृष्णा शेळके यांच्या अल्पवयीन मित्रा ने तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनला दिली आहे. आरोपींची ओळख अजुन झाली नसून चारही फरार आरोपींचा शोध तळेगाव दाभाडे पोलीस करत आहेत.












