विशेष प्रतिनिधी – माजी महापौर दत्ता दळवी यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुलूंड कोर्टाकडून दत्ता दळवींना जामीन मंजूर करण्यात आला आहे. 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली आहे.
आरोपी वरिष्ठ नागरिक असून त्यांना काही आजार देखील आहेत, तसेच ते पळून जाण्याची भीती नाही म्हणून जामीन मंजूर करण्यात आल्याचं न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत अपशब्द वापरल्या प्रकरणी दत्ता दळवींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना अटकही करण्यात आली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधातील अवमानकारक जाहीर वक्तव्य प्रकरण दत्ता दळवींना भोवलं होतं. याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. दत्ता दळवी हे शिवसेनेच्या कडवट शिवसैनिकांपैकी एक. शिवसेनेतील फुटीनंतर दळवींनी ठाकरेंना आपला पाठिंबा जाहीर केला. मुख्यमंत्र्याबाबत अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी दत्ता दळवी चर्चेत आले होते.
दत्ता दळवी यांच्या भाषेवर आक्षेप घेत भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी भादंवि 153 (A), 153 (B), 153(A) (1) सी,294, 504,505 (1) (C) कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती.
यानंतर त्यांना कोर्टात हजर केलं असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देखील सुनावण्यात आलेली. मात्र आज जामीन घेत असताना देखील सूडबुद्धीनं विलंब केला जातोय असा आक्षेप ठाकरे गटाकडून सातत्यानं घेतला जात होता. आज अखेर त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली आहे.












