पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २१ : पुणे परिसरात दहशत माजविणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला पोलिसांकडून स्थानबद्ध करण्यात आले आहे. ही घटना सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
विनायक तानाजी गायकवाड ( वय २२ वर्षे, रा. म्हसोबा मंदिराजवळ, तळजाईमाता वसाहत, पदमावती, पुणे ) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या साथीदारांसह सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अग्निशस्त्र, कोयता, तलवार, या सारख्या जीवघेण्या घातक हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, दंगा, बेकायदा अग्निशस्त्र हत्यार बाळगणे यासारखे अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. मागील ५ वर्षांच्या कारकिर्दीत त्याच्याविरुद्ध पाच गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. रितेश कुमार यांच्या आदेशावरून श्री. सुरेद्र माळाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहकारनगर पोलीस स्टेशन पुणे व श्री. चंद्रकांत बेदरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पी.सी.बी. गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी आरोपीस एम. पी. डी. ए. कायद्यांतर्गत नागपुर मध्यवर्ती कारागृह, नागपुर येथे एका वर्षाकरिता स्थानबद्ध केले आहे.












