देहूरोड : विवाहितेने दारु पिण्यासाठी पतीकडे वारंवार पैशांची मागणी केली. यावरुन विवाहितेने आणि तिच्या बहिणीने छळ केला. या त्रासाल वैतागून पतीने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी विवाहितेसह तिच्या बहिणीला पोलिसांनी अटक केली आहे.
नारायण मधुकर निर्वळ (वय-३५) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत नारायण यांचा भाऊ ज्ञानेश्वर मधुकर निर्वळ (वय-३९ रा. सोमठाणा ता. मानवत, जि. परभणी) यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी नारायण निर्वळ यांची पत्नी व तिची बहीण यांच्यावर आयपीसी ३०, ३४ नुसार गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायण निर्वळ हे अॅनिमेशन क्षेत्रात कार्यरत होते. काही मित्रांसोबत मिळून ते अॅनिमेशनचा व्यवसाय करीत होते. त्याच्या पत्नीला देखील काही दिवसांपूर्वी ‘वर्क फ्रॉम होम’ मिळाले होते. दरम्यान, नारायण यांची पत्नी आणि तिच्या बहिणीने नारायण यांच्याकडे दारु पिण्यास पैशांची मागणी केली. तसेच नारायण यांच्या पत्नीची बहिणीने पत्नीच्या चुकीच्या वर्तवणुकीस प्रोत्साहन दिले. नारायण यांच्याशी वारंवार वाद घालून त्यांना मानसिक व शारीरिक त्रास दिला.
पत्नी आणि तिच्या बहिणीकडून होत असलेल्या त्रासाला वैतागून नारायण यांनी १७ जानेवारी रोजी राहत्या घरी विषारी द्रव प्राशन केले. त्यांना उपचारासाठी तातडीने पिंपरी येथील वाय.सी.एम. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. नारायण यांच्यावर उपचार सुरु असताना शनिवारी (दि.२०) त्यांचा मृत्यू झाला. नारायण यांच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरुन नारायण यांची पत्नी आणि तिच्या बहिणीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. पुढील तपास देहूरोड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सोहन धोत्रे करीत आहेत.












