यंदा दिवाळीमध्ये पुणे रेल्वे विभागातून २८ लाख प्रवाशांनी प्रवास केला असून, त्यामधून पुणे रेल्वेला ६० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गेल्या वर्षीच्या दिवाळीपेक्षा यंदा प्रवासी व उत्पन्नामध्ये मोठी वाढ झाली असल्याचे आढळले आहे. मध्य रेल्वेतील पुणे रेल्वे हा महत्त्वाचा विभाग आहे.
पुण्यातून दिवासाला १२०पेक्षा जास्त गाड्या धावतात. त्यामध्ये मेल एक्स्प्रेस गाड्यांचा समावेश आहे. याबरोबरच रेल्वेकडून काही साप्ताहिक गाड्या चालविल्या जातात. यंदा दिवाळीच्या काळात लांब पल्ल्याच्या गाड्यांना खूपच ‘वेटिंग’ असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने नागपूर, दानापूर, गोरखपूर व इतर काही शहरांसाठी विशेष गाड्यादेखील चालविल्या होत्या.
मात्र, दिवाळीच्या काळात सर्व रेल्वे गाड्यांना खूपच गर्दी होती. दिवाळी व छठपूजेमुळे उत्तर भारतात जाणाऱ्या गाड्यांना जास्त मागणी होती; तसेच विदर्भात जाणाऱ्या रेल्वेला खूपच गर्दी असल्याचे दिसून आले. रेल्वे प्रशासनाने एक ते १९ नोव्हेंबर दरम्यान २२ विशेष रेल्वे गाड्यांच्या २६० फेऱ्या केल्या. त्यामुळे दिवाळीच्या काळात रेल्वेला तिकीट विक्रीतून चांगले उत्पन्न मिळाले.












