बंगळुरु-मुंबई महामार्गावर उतारावर वाहनाचा वेग नियंत्रित राखता न आल्याने नवले पुल दरम्यान वारंवार अपघात होत असतात. पण, आज मुंबई -बंगळुरु महामार्गावर कात्रजकडे जाणार्या रस्त्यावर अपघात घडला. कंपनीच्या कार्यालयाच्या जागेतून बाहेर पडत असताना मुंबईकडून वेगाने आलेल्या डंपरने बसला जोरात धडक दिली. त्यात ७ प्रवासी जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी सकाळी ७ वाजता घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवले पुलाजवळ व्हीआर एल ट्रॅव्हल्स कंपनीचे कार्यालय आहे. कंपनीची बस प्रवाशांना घेऊन सकाळी सात वाजण्याच्या सुमारास कार्यालयाच्या जागेतून बाहेर पडून मुख्य रस्त्यावर येत होती. त्यावेळी मुंबईकडून वेगाने आलेल्या डंपरला ही बस दिसलीच नाही. त्याने बसला चुकविण्याचा प्रयत्न केला. परंतु, वेगात असलेल्या डंपरने बसच्या उजव्या बाजूला पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यात बसचे तसेच डंपरचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातात ७ जण जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन काही वेळातच दोन्ही वाहने बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली.












