काझड आणि अकोले (ता. इंदापूर) गावांच्या सीमेवरील नीरा-भीमा जोड प्रकल्पाच्या बोगद्याच्या शाफ्ट क्रमांक चारमध्ये विद्युत पंपाची पाहणी करताना ३०० फूट खोल बोगद्यात पडलेल्या दोन शेतकऱ्यांचा अखेर मृत्यू झाला.
रतिलाल बलभीम नरुटे (वय ५५) आणि अनिल बापूराव नरुटे (वय ३५, दोघे रा. काझड) अशी मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत. बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हे दोन शेतकरी पाण्यातील मोटार दोरीच्या साह्याने उचलताना बोगद्यामध्ये पडले. प्रशासनाच्या वतीने बचाव कार्य सुरू करण्यात आले.
रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. घटनेची माहिती मिळताच इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील, निवासी तहसीलदार अनिल ठोंबरे, भिगवण पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक दिलीप पवार, वालचंदनगर ठाण्याचे सहायक निरीक्षक विक्रम साळुंखे आदी घटनास्थळी दाखल झाले.
राहुल नरुटे, हनुमंत वीर, रणजित नरुटे हे तीन स्थानिक युवक क्रेनच्या साह्याने मदत कार्यासाठी बोगद्यामध्ये गेले होते. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे, आमदार दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मृतांच्या नातेवाइकांच्या घरी भेट देऊन सांत्वन केले. राज्य सरकारतर्फे त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.












