पुणे : ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत पुण्याचा नावलौकीक वाढावा यासाठी महापालिका Pune Municipal Corporation (PMC) जनतेच्या पैशांतून सार्वजनिक भिंती, रस्ते दुभाजकांची रंगरंगोटी करत आहे. त्याचवेळी सत्ताधारी भाजपकडून प्रचारासाठी भिंतींवर ‘कमळाचे’ चिन्ह आणि निवडणुकीच्या घोषणांच्या जाहिराती रंगवून ‘विद्रुपीकरण’ करत आहे. विशेष असे दस्तुरखुद्द नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या गुजरातमध्ये सार्वजनिक भिंतींवरील जाहिरात फलकांच्या संहितेचे काटेकोर पालन केले जात असताना त्याच मोदी यांना तिसर्यांदा पंतप्रधानपदी बसविण्यासाठी जाहिरात फलक संहितेची मोडतोड करण्यासाठी स्थानीक भाजप नेते (BJP Leaders In Pune) सरसावल्याचा विरोधाभास पाहायला मिळत आहे.
महिन्याभरात आगामी लोकसभा निवडणुकीची (Pune Lok Sabha) घोषणा होईल. सत्ताधारी भाजपसोबतच सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. गेली दहा वर्षे केंद्रात, राज्यात सात वर्षे आणि पाच वर्षे महापालिकेत सत्तेत असलेली भाजपा देखिल नेहमीप्रमाणे तयारीत एक पाउल पुढे आहे. दरम्यान, कार्यकर्त्यांच्या बैठकांमध्ये केंद्र व राज्य सरकारच्या योजना प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याच्या सूचना आणि यंत्रणा उभारणार्या भाजपच्या नेत्यांनी आतापासूनच प्रचार फलकांवरही जोर दिला आहे. नेत्यांचे वाढदिवस, दौरे आणि विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने शहरात प्रत्येक ठिकाणी जाहिरातबाजी करण्यात येत आहे.
यामध्ये बेकायदा फलकांचे प्रमाण अधिक आहे. परंतू यापुढे जाउन आता वरिष्ठ नेत्याने नुकतेच झालेल्या पदाधिकारी बैठकीत सार्वजनिक आणि खाजगी सोसायट्यांच्या भिंतींवर ‘कमळ’ या चिन्हासोबतच मोदींना तिसर्यांदा पंतप्रधान करण्यासाठीची घोषवाक्य पेंट करण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश शिरसावंद्य मानून पदाधिकार्यांनी पेटींग सुरू केले आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून गेल्या काही वर्षांपासून स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देशभरात स्वच्छ शहरांसाठी स्पर्धा सुरू केली आहे. यानिमित्ताने देशभरातील सर्वच शहरांमध्ये सार्वजनिक स्वच्छतेसोबत रस्त्याच्या कडेच्या भिंती देखिल स्वच्छ राहाव्यात यासाठी त्यावर स्वच्छतेसह विविध सामाजिक संदेश, आरोग्य, पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने संदेश आणि चित्र रंगवली जात आहेत. यासाठी नगरसेवकांनी महापालिकेच्या निधीचा वारेमाप वापर केला आहे.
तसेच महापालिका प्रशासनही दरवर्षी त्यावर लाखो रुपये खर्च करत आहे. नुकतेच झालेल्या जी २० परिषदेनिमित्त पुण्यात होणार्या बैठकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्याप्रमाणावर सार्वजनिक भिंती, दुभाजकांची रंगरंगोटी करण्यात आली. प्रशासनाने यासाठी उपलब्ध झालेल्या ५० कोटी रुपयांतून शहरातील १५ प्रमुख रस्ते आदर्श रस्ते करण्यासाठी कामे सुरू केली आहेत.
परंतू महापालिका प्रशासनाच्या या प्रयत्नांवर भाजपकडून प्रचारासाठी पाणी फेरण्यात येत आहे. सार्वजनिक तसेच खाजगी इमारतींच्या भिंतींवर पक्ष चिन्ह आणि घोषवाक्य रंगविण्यात येत आहेत. बेकायदा फलक आणि बेकायदा पेटींग करून भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशन संकल्पनेवर बोळा फिरवत असल्याचे पाहायला मिळत आहे.
सार्वजनिक आणि खाजगी भिंतींवर विनापरवाना जाहीरातबाजी करून सत्ताधारी भाजप शहराचे विद्रुपीकरण करत आहे. निवडणुक आचारसंहिता लागल्यावर या जाहिराती पुसण्याचा खर्च प्रशासनाला पुन्हा नागरिकांच्याच पैशातून करावा लागणार आहे. एकीकडे पंतप्रधान स्वच्छ भारत मिशन राबवितात. त्याचवेळी त्यांचाच पक्ष विद्रुपीकरण करत आहे. महापालिकेने या जाहिरातबाजीचे शुल्क वसुल करावे. तसेच विद्रुपीकरण केल्याप्रकरणी भाजपच्या संबधित पदाधिकार्यांवर कायदेशीर कारवाई करावी.
– एकनाथ ढाले, शहर संघटक, आम आदमी पार्टी
भाजपच्यावतीने आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिंतींवर लेखन मोहीम राबविण्यात येत आहे. खाजगी इमारती व सोसायट्यांच्या मालकिच्या भिंतींवर संबधितांच्या परवानगीनेच पक्षचिन्ह आणि घोषवाक्य लिहिण्यात येणार आहेत. ही मोहीम पुढील पंधरा दिवसांसाठी असेल.












