पुणे : टोळक्याने दोघा तरुणांना लोखंडी रॉड आणि बांबूने बेदम मारहाण करून दहशत माजविण्याची घटना पर्वती भागातील जनता वसाहत परिसरात घडली. या प्रकरणी पर्वती पोलिस ठाण्यात १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी रोहित गोरखे यांनी पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोहित रविवारी (ता. २१) दुपारी त्याचा मित्र पवन कोळी याच्यासमवेत जात होता. त्यावेळी रोहितच्या मित्राचा भाऊ शंकर काकडे याला काही मुले मारहाण करीत होती.
रोहित भांडण सोडविण्यासाठी गेला. त्यावेळी टोळक्याने रोहित आणि पवन या दोघांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यांच्या डोक्यात बांबू आणि लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केले. यावेळी टोळक्याने जखमींच्या मदतीसाठी आलेल्या नागरिकांनाही धमकावून परिसरात दहशत निर्माण केली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक जी. डी. घावटे करीत आहेत.












