पुणे, दि. १४ : स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आज सोमवार दि. १४ ऑगस्ट रोजी गृह मंत्रालयाकडून पोलिसांना विशेष सेवा आणि उल्लेखनीय कामगिरीसाठी पदकाने सन्मानित करण्यात येते. या सन्मानित होणाऱ्या अधिकाऱ्यांची यादी गृह मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आली आहे.
गृहमंत्रालयाकडून पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त मा. विनय कुमार चौबे यांना त्यांच्या कारकीर्दीतील उल्लेखनीय कामगिरीसाठी राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे. राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याबद्दल सर्वच स्तरांवरून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
प्रत्येक वर्षी प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या विशिष्ट सेवांसाठी राष्ट्रपती पोलीस पदक तसेच शौर्य पोलीस पदकाने अधिकाऱ्यांना सन्मानित केले जाते. यावर्षी देशात एकूण ६४२ अधिकाऱ्यांना वेगवेगळे पदक जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील ३३ अधिकाऱ्यांना शौर्य पदक देण्यात येणार असून ३ अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.
याआधी ते मुंबई येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागात अतिरिक्त महासंचालक या पदावर कार्यरत होते. तेथे त्यांनी सप्टेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२३ या कार्यकाळात पदभार सांभाळला होता. सध्या ते पिंपरी चिंचवड येथे आयुक्त म्हणून पदभार सांभाळत आहेत.












