पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०९ : तळवडे येथील मेणबत्ती तयार करण्याच्या कारखान्याला शुक्रवारी (ता. ८) रोजी लागलेल्या आगीत सहा महिलांचा होरपळून मृत्यू झाला. तसेच नऊ महिला व एक पुरुष कामगार गंभीर जखमी झाले असून, त्यांना पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तळवडेतील ज्योतिबानगर परिसरात शुक्रवारी दुपारी तीनला ही दुर्घटना घडली. हा प्रकार समजताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन, आग आटोक्यात आणली. तसेच जखमी आणि मृत महिलांना बाहेर काढले. आग इतकी भयंकर होती की मृतांची ओळख पटले अवघड झाले होते.
गंभीर जखमींपैकी दोन महिलांना ससून रुग्णालयात पाठवले होते. उर्वरित सात गंभीर महिला व एका पुरुषावर पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) ‘बर्न वॅार्ड’ नसल्याने प्राथमिक उपचार करून, पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात पाठविण्यात आले.
आगीची घटना घडल्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली. जखमींना ‘वायसीएम’ला नेण्यात आल्यावर तिथे पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. पोलीस या प्रकरणाबाबत अधिक तपास करीत आहेत.












