पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०४ : 1 ते 5 फेब्रुवारी 2024 या कालावधीत नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या दुसऱ्या “प्लास्टो फोकस” प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचा प्रचार आणि प्रसार करून जास्तीत जास्त नागरिक आणि उद्योजकांना या प्रदर्शनाकडे आकर्षित करण्यासाठी पिंपरी चिंचवड प्लास्टिक असोसिएशनच्या (पिसिपिए) वतीने रागा पॅलेस काळेवाडी, पिंपरी येथे “प्लास्टो फोकस” पूर्व प्रक्षेपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास परिसरातील उद्योजक मोठ्या संख्यने उपस्थित होते, अशी माहिती पिंपरी चिंचवड प्लास्टिक असोसिएशन चे अध्यक्ष नितीन गट्टानी यांनी दिली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्लास्टिक मशीन मॅनफॅक्चरिंग इंडियाचे अध्यक्ष महेंद्र पटेल हे होते. यावेळी पिंपरी चिंचवड प्लास्टिक असोसिएशन चे उपाध्यक्ष संदिप लखानी, सचिव रोहित बोरा, सदस्य अश्विन गर्ग, नितीन कोंढाळकर, पंकज गर्ग, सुनील गोसावी, नितीन देवकर यांच्यासह कर्नाटका, गुजरात, दिल्ली, पुणे, पिंपरी चिंचवड येथील असंख्य उद्योजक उपस्थित होते.
यावेळी महेंद्र पटेल म्हणाले, पॉलीमर क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान विकसित करण्यात येत आहे. त्याधारे अत्यधुनिक यंत्रसामग्री निर्माण करण्यात येत आहेत. या नवीन तंत्रज्ञान व यंत्रसामग्रीचा वापर करून पॉलीमर क्षेत्रात उत्पादन वाढविण्यासाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत.
पीसीपीए चे अध्यक्ष नितीन गट्टानी म्हणाले, दिल्ली येथे आयोजित “प्लास्टो फोकस” कार्यक्रमात पॉलीमर क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञांन व यंत्रसामग्रीचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. यामध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील हजारो उद्योजक, संशोधक सहभागी होणार आहेत. तसेच या प्रदर्शनाला लाखो नागरिक व अभ्यासक भेट देणार आहेत. महाराष्ट्रातून मोठ्या संख्यने उद्योजक या प्रदर्शनाला भेट देणार आहेत. शिवाय पिंपरी चिंचवड प्लास्टिक असोसिएशनसह पुणे, पिंपरी चिंचवड परिसरातून 5 हजार पेक्षा अधिक पॉलीमर उद्योजक या प्रदर्शनाला भेट देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रदर्शनाला मोठ्या संख्यने उद्योजकांनी भेट द्यावी असे, आवाहन गट्टानी यांनी केले आहे.
“प्लास्टो फोकस” पूर्व प्रक्षेपण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विन गर्ग यांनी केले. तर आभार नितीन कोंढाळकर यांनी मानले.












