पिंपरी – वस्तू आणि सेवा कार्यालयातील (जीएसटी) महिला अधिकाऱ्यास तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाने ताब्यात घेतले. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी एका ३२ वर्षीय व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे कार्यालयात तक्रार दिली आहे. मालती रमेश कठाळे (वय ४३) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.
‘एसीबी’चे पोलिस उपअधीक्षक नितीन जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिकाने पत्नीच्या नावाने नवीन जीएसटी क्रमांक घेण्यासाठी वस्तू आणि सेवा कार्यालयात ऑनलाइन अर्ज केला होता. त्यासाठी अडीच हजार रुपये शुल्क भरले होते. हे प्रकरण वर्ग-२ अधिकारी मालती कठाळे यांच्याकडे प्रलंबित होते. कठाळे यांनी व्यावसायिकास कार्यालयात समक्ष बोलावून जीएसटी क्रमांकांसाठी तीन हजार रुपये लाचेची मागणी केली.
याबाबत व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे कार्यालयात तक्रार दिली. त्याची शहानिशा करून ‘एसीबी’च्या अधिकाऱ्यांनी बुधवारी (ता. ६) सायंकाळी जीएसटी कार्यालयात सापळा रचून कठाळे यांना लाच स्वीकारताना ताब्यात घेतले.
‘एसीबी’चे पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रसाद लोणारे करीत आहेत.












