पुणे : पुण्याचे माजी खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली. त्यानंतर पोटनिवडणूक होईल अशी सगळ्यांना अपेक्षा होते पण पोटनिवडणूक झाली नाही आणि पुणे लोकसभेची जागा रिक्त राहिली त्याजागेवरती काँग्रेसच्या मित्र पक्षांनी दावा ठोकला पण पुणे लोकसभा ही काँग्रेसची पारंपरिक जागा आहे.
आता काँग्रेसकडून पुणे लोकसभेसाठी इच्छुकांकडून नावे मागविण्यात आली होती. त्यानुसार राष्ट्रीय पातळीवर आणि राज्य पातळीवर या नावांबाबतचा सर्वेक्षण सुरू झाले आहे. ही प्रक्रिया १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होईल, त्यानंतर उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाईल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची पश्चिम महाराष्ट्रासाठी बैठकीपूर्वी नाना पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारवर टीका केली.
पुणे लोकसभेसाठी काँग्रेसकडून वीस इच्छुकांनी नावे दिली आहेत. त्यातच कसबा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीतील नेत्यांची भेट घेतली होती. त्यामुळे धंगेकर लोकसभेसाठीचे उमेदवार असतील का, अशी विचारणा पटोले यांच्याकडे करण्यात आल्यानंतर त्यांनी उमेदवारांच्या नावाबाबत पक्ष पातळीवर सर्वेक्षण सुरू असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, राष्ट्रीय पातळीवर उमेदवारांबाबतचे सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रदेश पातळीवरीही ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सर्वेक्षण पंधरा फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होईल. त्याचा अहवाल तयार करण्यात आल्यानंतर सक्षम उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाईल.












