पुणे : सिंहगड रोडवरील नऱ्हे परिसरातील एका घरात वडील आणि मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. दोघांच्या मृत्यू मागचे कारण अद्याप समजू शकले नाही. मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवले असून अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण समजू शकेल असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
अरुण पायगुडे (वय-६४) व ओंकार पायगुडे (वय-३२) असे मृतावस्थेत आढळून आलेल्या दोघांची नावे आहेत. हा प्रकार नऱ्हे परिसरातील व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कूल जवळ असलेल्या एका सोसायटीत घडला आहे. याबाबत सिंहगड पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अरुण पायगुडे हे रेल्वेतून निवृत्त झाले आहेत. त्यांच्या एका मुलीचा विवाह झाला आहे. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले आहे.
अरुण पायगुडे यांचा मुलगा ओंकार याचा दोन वर्षापूर्वी अपघात झाला होता. तेव्हापासून त्याची मानसिक स्थिती बिघडली होती. तो घरातून बाहेर जात नव्हता. अरुण आणि त्यांचा मुलगा ओंकार यांना दारु पिण्याचे व्यसन होते, अशी माहिती सिंहगड रोड पोलिसांनी दिली आहे. पायगुडे यांच्या घरातील कचरा घेण्यासाठी सफाई कामगार आला. त्यावेळी दोघेही बेशुद्धावस्थेत पडल्याचे त्याने पाहिले. यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.












