पुण्यात यूपीएससी (UPSC) आणि एफवाय बीकॉमच्या क्लाससाठी एका शिक्षकाच्या घरी जाणाऱ्या १९ वर्षीय तरुणीचा त्याच शिक्षकाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
याप्रकरणी क्लासच्या शिक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जून २०२३ ते १८ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत एका अकॅडमीत घडली.
याबाबत पीडित १९ वर्षीय मुलीने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.२३) फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमित सिरमनवर (वय-२८ रा. मिटकॉन कॉलेज मागे, बालेवाडी, पुणे) याच्यावर आयपीसी ३५४अ, ३२३, ३२४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आरोपीच्या अकॅडमीत युपीएससी तसेच एफवाय बीकॉमच्या क्लास करीता जात होती. दरम्यान क्लास घेत असताना आरोपीने पीडित मुलीला घरातील कामे करायला लावली.
काम केले नाही तर प्लास्टिकट्च्या छडीने मारहाण केली. तसेच अश्लील भाषेत बोलून आरोपीने वारंवार विनयभंग केल्याचे फिर्य़ादीत म्हटले आहे. या संपूर्ण प्रकारानंतर मुलीने पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.
तरुणीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.












