पिंपरी- रिक्षातून प्रवास करणाऱ्या प्रवाशाला मारहाण करून लुटणाऱ्या रिक्षा चालकाला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.७) रात्री पावणे बाराच्या सुमारास पुणे स्टेशन समोरील सम्राट गल्ली मध्ये घडला. चांद पाशा फरीदसाब (वय-४६) रा. गोंधळे नगर, गल्ली नं. १०, हडपसर) असे अटक केलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे.
याबाबत प्रशांत संपत पवार (वय-१९ रा. बालाजी नगर, कात्रज, पुणे) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी रिक्षा चालकावर भा.दं.वी. कलम ३९२, ३२३, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रशांत पवार हे आरोपीच्या रिक्षातून (एमएच १२ व्हि यु ९८८५) केसनंद फाटा येथुन कात्रज येथे जात होते. रिक्षात ते एकटे असल्याचा गैरफायदा घेऊन आरोपीने पुणे स्टेशन समोरील सम्राट गल्लीमध्ये रिक्षा बाजूला उभी केली. आरोपीने फिर्यादी यांना मारहाण करुन त्यांच्या पॅन्टच्या खिशातून रोख रक्कम व ९० हजार रुपये किंमतीचा मोबाईल जबरदस्तीने काढून घेऊन पळून गेला.
याबाबत फिर्यादी यांनी तक्रार दिल्यानंतर बंडगार्डन पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन अटक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.












