पिंपरी – आपल्या फ्रिजला करंट लागत असल्याचे माहिती असून देखील एका १७ वर्षीय बाल कामगाराला फ्रिजवर चढून काम करण्यास सांगितले. या दरम्यान मुलाचा करंट लागून मृत्यू झाला आहे. ही घटना तळवडे येथील येवले चहा येथे घडली आहे.
यावरून पोलिसांनी तळेवडे येथील येवले चहा चालक गणेश जगताप याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी प्रेमकुमार सिद्धराम बनसोडे (वय 43, रा. निगडी) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाचे वय १७ आहे हे माहिती असून देखील आरोपीने त्याला कामावर ठेवले. तसेच दुकानातील फ्रीजचा बॉडीमध्ये करंट उतरत असल्याचेही आरोपीला माहिती होते. कामगारांच्या सुरक्षितते बाबत आरोपीने कोणतीही उपाययोजना केली नाही. उलट फिर्यादीच्या मुलाला सोमवारी फ्रिजवर चढून चहाचे कप काढण्यास सांगितले. यामुळे फिर्यादीच्या मुलाला जोरदार करंट लागले. त्यात फिर्यादीच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.
यावरून अल्पवयीन मुलाला बेकायदेशीररित्या कामावर ठेवणे तसेच कामगारांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली नाही म्हणून आरोपीवर बालकामगार सुधारीत अधिनियम अतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












