बहिणीबाबत विचारणा केल्याच्या कारणावरुन दोन तरुणांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करुन गंभीर जखमी केले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार खेड तालुक्यातील निघोजे येथील सैनी कंपनी समोरील रोडवर घडला आहे. हा प्रकार रविवारी (दि.२१) रात्री साडे दहाच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी महाळुंगे एम.आय.डी.सी. पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत योगेश अनिल चव्हाण (वय-२१ सध्या रा. सावरदरी, ता. खेड मुळ रा. मु.पो. तोतोला ता. लोणार जि. बुलढाना) यांनी सोमवारी (दि.२२) महाळुंगे एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन निलेश विलास राठोड (वय-२५ रा. कड वस्ती, निघोजे-कुरळी रोड, कुरळी), नारायण मधुकर चव्हाण (वय-२५ रा. मंत्रा सिटी निघोजे), कृष्णा उत्तम जाधव (वय-३० रा. निघोजे, ता.खेड) यांच्यावर भा.दं.वि. कलम ३२६, ३२३, ५०४, ५०६, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी एकमेकांचे ओळखीचे व नातेवाईक आहेत. फिर्यादी यांची चुलत बहिण कोठेतरी निघून गेली आहे. त्यामुळे फिर्यादी यांनी आरोपी निलेश राठोड याला फोन करुन बहिणीबाबत चौकशी केली. त्यावेळी आरोपीने फिर्यादी यांना शिवागाळ करुन सैनी कंपनीजवळ बोलावून घेतले. फिर्यादी व त्यांचा चुलत भाऊ आकाश रविवारी रात्री साडे दहाच्या सुमारास कंपनीजवळ गेले.
त्यावेळी आरोपी निलेश याने फिर्यादी यांना लाकडी दांडक्याने डोक्यात मारुन जखमी केले. तसेच इतरांन फिर्यादी यांच्या चुलत भावाला धक्कबुक्की करुन जीवे मारण्याची धमकी दिली. पुढील तपास महाळुंगे एम.आय.डी.सी. पोलीस करीत आहेत.












