पुणे शहरात बागेश्वर धाम महाराज यांचा कार्यक्रम २० ते २२ नोव्हेंबर रोजी जगदीश मुळीक फाउंडेशनकडून आयोजित केला आहे. भाजपचे माजी शहराध्यक्ष यांनी यासंदर्भातील बॅनर्स शहरात लावले आहे.
हनुमान कथा सत्संग कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच यावेळी बागेश्वर महाराजांचा दिव्य दरबारही भरणार आहे. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून पुण्यात होणाऱ्या बागेश्वर महाराजांच्या कार्यक्रमाला विरोध करण्यात आला आहे.
एकीकडे कार्यक्रमाची जय्यत तयारी भाजपकडून होत असताना दुसरीकडे राष्ट्रवादीकडून कार्यक्रमाला विरोध होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोशल मीडिया सेलचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून या कार्यक्रमास विरोध केला आहे. जगद्गुरू संत तुकारामांच्या भूमीत असल्या भोंदू बाबांना थारा नाही, अशी पोस्ट जगदाळे यांनी करत कार्यक्रमास विरोध दर्शवला आहे.












