बारामती : आपण शब्द दिला म्हणजे पाळणार. कसा निवडून येतो तेच पाहतो, अशी जाहीर भाषणांमध्ये विरोधकांना चॅलेंज देणारे उपमुख्यमंत्री अजित पवार करत असतात. अमोल कोल्हे हे शरद पवार गटात गेल्याने अजित पवार यांच्या जिव्हारी लागले. त्यांनी थेट अमोल कोल्हेंच्या विरोधात उमेदवार देणार आणि तो निवडूण आणणार असे चॅलेंज दिले. बारामती मतदाससंघात देखील अजित पवार मोर्चेबांधणी करत असल्याची चर्चा आहे. अजित पवारांच्या चॅलेंजनंतर बारामती आणि शिरुर मतदारसंघात पार्थ पवार सक्रिय झाल्याचे चित्र होते. आता पार्थ पवार यांच्या पाठोपाठ अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा देखील या मतदारसंघांमध्ये दौरे वाढले आहेत.
शिरूर मतदार संघ आणि बारामती मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघांमध्ये शरद पवार गटाचे खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. मात्र त्यांच्या विरोधात कोण दंड थोपटणार याबाबत अजून स्पष्टता आली नाही. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि पुत्र पार्थ पवार हे निवडणूक रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा जोर धरत आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांचा बारामती आणि शिरूर मतदार संघामध्ये सक्रिय झाल्याचे दिसून येत आहेत.












