मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील सहा महिन्यापासून आंदोलन करत आहे. त्यांच्या नाकातून रक्त आले तरी सरकारने आरक्षण दिले नाही. बाळा यापुढे कोणत्याही नेत्याच्या नादाला लागू नको, अशी चिठ्ठी लिहित पैठण तालुक्यातील एका तरुणाने गळफास लावून घेत आत्महत्या केली.
मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले आत्महत्यांचे सत्र काही केल्या थांबत नाहीये. राज्य सरकारने मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेत त्याची अंमलबजावणीही सुरू केली. मात्र ओबीसीतून सगेसोयऱ्यासह मराठ्यांना आरक्षणाच्या मागणीवर आंदोलक मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. दरम्यान, विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतांनाच अंतरवाली सराटी येथील आंदोलन दडपण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात असल्याचा आरोप केला जात आहे.
अशातच पैठण तालुक्यातील आपेगांव येथील तरुणाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केली. त्याच्याजवळ एक सुसाईड नोट सापडली असून ज्यात आपण मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत असून, ‘माझ्या मुलाने नेत्यांच्या नादी लागू नये’ असा उल्लेख आहे. सोपान भागवतराव औटे (वय 40 वर्ष) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आपेगाव येथील सोपान भागवतराव औटे यांनी गट क्र.316 मधील शेतातील लिंबाच्या झाडाला सोमवारी सकाळी 8 वाजता गळफास घेतला. पैठण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह खाली उतरवून पैठण येथील शासकीय रुग्णालयात दाखल केला. पंचनाम्यादरम्यान पोलिसांना एक चिठ्ठी सापडली.त्यात ‘माझ्या मृत्यूशी वैयक्तिक कोणाचा काही एक संबंध नाही. मराठा योद्धा मनोजदादा जरांगे यांच्या नाकातून रक्त आले, तरीही सरकार आरक्षण देत नाही. या सरकारचा निषेध म्हणून मी आत्महत्या करीत आहे’ असा उल्लेख आढळला. माझा मुलगा आदी संतांच्या, देवाच्या नादी लाग. बाळा कोणत्याच नेत्याच्या नादी लागू नको, असे सोपान यांनी आपल्या मुलाला उद्देशून पत्रात लिहिले आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.












