सध्या सुरू असलेल्या पुरुष क्रिकेट विश्वचषकात भारताविरुद्धच्या सामन्यात झालेल्या मोठ्या पराभवानंतर सोमवारी श्रीलंकेचे क्रीडामंत्री रोशन रणसिंघे यांनी श्रीलंका क्रिकेट बोर्ड बरखास्त केला .
गुरुवारी २ नोव्हेंबर रोजी झालेल्या भारत श्रीलंका सामन्यात श्रीलंका क्रिकेट संघाचा ३०२ धावांनी पराभव झाला . त्यामुळे श्रीलंकेच्या क्रिकेट चाहत्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या , ज्यानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे सचिव मोहन डी सिल्वा यांनी शनिवारी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला .
रणसिंघे यांनी घेतलेल्या निर्णयानंतर आता श्रीलंकेच्या क्रिकेट व्यवस्थापनासाठी ७ सदस्यीय अंतरिम समिती स्थापन करण्यात आली असून श्रीलंका संघाचे माजी कर्णधार अर्जुना रणतुंगा तिचे अंतरिम प्रमुख असतील. या समितीत दोन निवृत्त न्यायाधीशांचाही समावेश करण्यात आला आहे .












