भोसरी परिसरात अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई करत ६ लाख ४९ हजार ०२० रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. यामध्ये एकाला अटक करण्यात आली असून ही कारवाई बुधवारी (दि. २२) दुपारी दीड वाजताच्या सुमारास बोऱ्हाडे वाडी मोशी येथील विवांता लाईफ विपुल सोसायटीच्या पार्किंग मध्ये करण्यात आली.
याबाबत अन्न व औषध प्रशासनाचे अन्न व सुरक्षा अधिकारी रा.म. खंडागळे यांनी भोसरी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन किशोर हरकचंद सुंदेचा (वय-४६ रा. बोऱ्हाडे वाडी, मोशी प्राधीकरण, पुणे) याला अटक केली आहे. तर गुटखा पुरवणारा गणेश गांधी (रा. थेरगाव, पिंपरी) याच्यावर आयपीसी ३२८, २७२, २७३, १८८, ३४ सह अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किशोर सुंदेचा याने त्याच्या टाटा इंन्टा व्ही १० (एमएच १४ एय.यु २०४२) या गाडीत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेल्या गुटख्याचा अवैधरित्या साठा करुन ठेवल्याची माहिती मिळाली. त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकारी रा.म. खंडागळे व त्यांच्या पथकाने विवांत लाईफ विपुल सोसायटीच्या पार्किंमध्ये छापा टाकून आरोपी सुंदेचा याच्या गाडीची झडती घेतली. त्यावेळी गाडीत प्रतिबंधित ६ लाख ४९ हजार २० रुपयांचा मानवी शरीरास अपायकारक असलेला गुटख्याचा साठा आढळून आला. पथकाने गुटखा जप्त करुन किशोर सुंदेचा याला अटक केली आहे. तर त्याला माल पुरवणाऱ्या गांधी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास भोसरी एम.आई.डि.सी. पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पानसरे करीत आहेत.












