रायसोनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केले संशोधन
मक्याच्या कणसाची साल काढून दाणे सोलण्याची प्रक्रिया तशी वेळखाऊच , मात्र व्यवसायाच्या दृष्टिकोनातून ही प्रक्रिया सुलभ होणार आहे . त्यासाठी ‘ जी . एच . रायसोनी अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यंत्र तयार केले आहे . इतकेच नव्हे तर या कॉर्न पीलिंग मशिनचे पेटंटही मिळविले आहे . त्यामुळे त्याचा राज्यातच नव्हे तर देशातही उपयोग होऊ शकेल.
प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना विकसित केलेल्या यंत्राला केंद्र सरकारकडून पेटंट मिळाले . महाविद्यालयाचे कॅम्पस डायरेक्टर डॉ . आर . डी . खराडकर , सहयोगी प्राध्यापक डॉ.अरुण ठाकरे आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे विद्यार्थी धीरज शहा , पांडुरंग पवार , निलेश पवार आणि छाया बडे यांनी हे यंत्र विकसित केले.
यंत्राची अभिनव रचना, उपयुक्तता यामुळे आता मका पिकावरील प्रक्रियेत कणसाची साल सुरक्षितरीत्या काढता येईल. यंत्राच्या रोलर्ससाठी अल्ट्रा हाय मॉलिक्युलर वेटेड ( यूएचएमडब्ल्यू ) पॉलिथिलीन मटेरियलचा वापर करण्यात आला असून त्याद्वारे हे यंत्र दीर्घकाळ टिकणारे आणि लवचिक करण्यात आले आहे. साइड रोलर्सवर चौकोनी आकाराच्या दातांमुळे दाण्यांचे नुकसान टाळता येते. कार्यक्षमता वाढविण्यासाठी विचारशील आणि धोरणात्मक डिझाइन केले असल्याचे डॉ. खराडकर यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी डिझाइननुसार प्रोटोटाइप विकसित केले . त्यामुळे ते सुद्धा पेटंटधारक आहेत . आमचे महाविद्यालय नेहमीच समाजातील विविध समस्या सोडवण्यासाठीच्या आणि उपयुक्त उपायांसाठी आवश्यक शिक्षण देते . त्यामुळे विद्यार्थ्यांना वास्तविक जीवनातील समस्या समजून घेता येतात आणि त्यावर उपाय शोधता येतात,असे डॉ. खराडकर यांनी नमूद केले.












