दि. २६ रोजी महाळुंगे येथील इंगळे गावात झालेल्या तरुणाच्या खुनातील एका आरोपीला पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या दरोडा विरोधी पथकाने दि. २७ रोजी पहाटे अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपी अभिराज शिवाजी जावळे(वय-२१ वर्षे) याला महाळुंगे एम.आई.डी.सी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तर इतर चार आरोपींना दि. २७ रोजी उशिरा महाळुंगे एम.आई.डी.सी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यातील छोटा साकेत नामक आरोपी अजूनही फरार असून महाळुंगे एम.आई.डी.सी पोलिसांच्याकडून त्याचा शोध सुरू आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि. २६ रोजी दुपारी १२ :३० वाजताच्या सुमारास महाळुंगे गावातील हॉटेल रेणुका ते ग्रामपंचायतकडे जाणार्या रोडलगत प्रतीक गैस रीपेरिंग दुकानाजवळ मयत रितेश संजय पवार (वय-३१ वर्षे) उभा असताना पूर्ववैमनस्यातून आरोपी शंभू भोसले व त्याच्या इतर पाच साथीदारांनी रितेशवर हल्ला केला. हल्ला एवढा भयावह होता की, आरोपींनी रितेशच्या तोंडावर लोखंडी कोयत्याने व लाकडी दांड्क्यांनी मारहाण करून जीवे मारले. तसेच रितेशला जिवंतच सोडायचे नाही या उद्देशाने आरोपी वैभव आंधळे याने रितेशच्या पाठीवर लोखंडी कोयत्याने वार केले. तर इतर दोन आरोपी शेखर नाटक व छोटा साकेत यांनी त्याला जीव जाईल अशा पद्धतीने लाकडी दांडक्यांनी गंभीर मारहाण केली. त्यात रितेशचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा मित्र संदेश बाबुराव भोसले (वय-२१ वर्षे) हा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेत आतापर्यन्त १) शंभू भोसले, २) अभि जावळे, ३) वैभव आंधळे, ४) विनोद बटलवार, ५) शेखर नाटक असे एकूण पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून एक आरोपी अजूनही फरार आहे.
सर्व आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर अजूनही काही धक्कादायक खुलासे आरोपींच्या चौकशी अंती बाहेर येण्याची शक्यता आहे. वरील सर्व आरोपींच्यावर महाळुंगे एम.आई.डी.सी पोलिस ठाण्यात भा. द. वि. कलम ३०२, ३०७, १४३, १४६, १४८, १४९, आर्म ॲक्ट कलम ४(२५), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगात फिरून आरोपींना २४ तासात अटक केल्याबद्दल पोलिस प्रशासनाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
वरील घटनेची कामगिरी दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहय्यक पोलिस निरीक्षक अबरीष देशमुख, पो. ह. उमेश पुलगम, गणेश हिगे, पोलिस शिपाई गणेश सावंत, सुमित देवकर यांनी एका आरोपीस अटक केली. तर महाळुंगे एम.आई.डी.सी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलिस निरीक्षक (गुन्हे) संतोष कसबे यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक सारंग चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक विलास गोसावी, पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव, पोलिस हवालदार युवराज बिराजदार,अमोल बोराटे, राजेंद्र कोणकिरे, विठ्ठल वडेकर, तानाजी गाडे, पोलिस नाईक संतोष काळे, पोलिस शिपाई शिवाजी लोखंडे, गणेश गायकवाड, शरद खैरे, राजेंद्र खेडकर, राहुल मिसाळ, अमोल माटे, बाळा पाटोळे यांनी केली आहे.












