सुमारे एक महिन्यापूर्वी गाडीला कट मारल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचा राग मनात धरत एका १८ वर्षीय तरुणाला रस्त्यात अडवून चार लोकांच्या टोळीने वार करत तक्रारदारास जीव मारण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना दिनांक १६ रोजी ९ वाजण्याच्या सुमारास सांगवी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. यासंदर्भात जखमी प्रेम अनिल कांबळे, वय १८, (मूळ रा. मोहन नगर, चिंचवड सध्या रा. जगताप पेट्रोल पंप शेजारी पिंपळे गुरव) याने सांगवी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.
प्रेम कांबळे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सोहेल अब्बास शेख, विनोद शिरसाट, ऋषी शिंदे व अथर्व चव्हाण (चौघे राहणार सांगवी) यांच्या विरोधात भा.दं. वि. कलम ३०७, ३२३, ५०४, ५०६, ३४ फौजदारी कायदा ३, ७ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१), ३७(३), १३५ शस्त्र अधिनियम कलम २५(४), २७ प्रमाणे गुन्हे दाखल करून यातील मुख्य आरोपी सोहेल अब्बास शेख याला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे एक महिन्यापूर्वी सोहेल शेख व प्रेम कांबळे यांच्यामध्ये गाडीला कट मारण्याच्या कारणावरून वादविवाद होऊन भांडण झाले होते. त्यावेळेला सोहेल शेख व अथर्व चव्हाण यांनी ‘तुला खूप माज आला आहे. एक दिवस तुला जिवंत ठेवत नाही’ अशी धमकी प्रेम याला दिली होती. दिनांक १६ रोजी प्रेम त्याच्या मित्रासोबत केस कापण्यास गेला असता रात्री ९ वाजेच्या सुमारास चारही आरोपी एकत्र येत आरोपी सोहेल शेख याने प्रेम कांबळे याला मला तुझ्या सोबत बोलायचं आहे असं म्हणत दुकानाबाहेर बोलाऊन घेतले व तू एक महिन्यापूर्वी माझ्या गाडीला कट का मारला होता व माझ्यासोबत भांडण का केले होते? असे विचारले असता प्रेम याने ‘ झालं गेलं सोडून टाक’ असे म्हंटले असता सोहेल शेख व त्याच्या साथीदारांनी ‘याला खूप माज आला आहे याला जीवंत सोडायचे नाही’ असे म्हणत दोघांनी त्याला हाताने मारहाण करत व पकडून ठेवून सोहेल शेख व अथर्व चव्हाण यांनी लोखंडी कोयत्याने प्रेम कांबळे च्या डोक्यावर व हातावर वार केले तसेच प्रेम याचा मित्र किरण गायकवाड हा भांडण सोडवायचा प्रयत्न करत असताना त्यालाही हातावर वार केले व जोरजोराने आरडाओरड करत ‘आम्ही या ठिकाणचे भाई आहोत आमचे येथे कोणी काही वाकडे करणार नाही’ असे म्हणत हातातले कोयते हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केली.अशी फिर्याद प्रेम कांबळे यांनी पोलिसांना दिली आहे. फरारी आरोपींचा पोलीस शोध घेत असून सांगवी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गंगाधर ढागे करत आहेत.












