मुंबई : मुंबई विद्यापीठाचा पाली विभाग व ओडिशा राज्याच्या कटक येथील सरला साहित्य संसद यांनी संयुक्तपणे ‘कलिंग आणि बुध्दीझम’ या विषयावर
विद्यानगरी येथे साहित्य संमेलन आयोजित केले होते.या साहित्य संमेलनाचे उद्घाटन प्रख्यात हिंदी लेखक आणि मुंबई विद्यापीठातील हिंदी विभागाचे प्राध्यापक डॉ. हुबनाथ पांडे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी सरला साहित्य संसदेचे संस्थापक व अध्यक्ष डॉ.प्रवाकर स्वेन होते. या साहित्य संमेलनाचे उद्घाटक प्रा. हुबनाथ पांडे यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात कलिंग आणि बौद्ध धर्मावर भाष्य केले.
सरला दास यांचे महाभारत हे भारतातील प्रादेशिक भाषांमधील पहिले पूर्ण महाभारत असल्याचेही त्यांनी सांगितले.मुंबई विद्यापीठाच्या पाली विभागाच्या समन्वयक डॉ. योजना भगत यांनीओडिशातील जौगढ आणि धौली येथील शिलालेख कलिंगवरील बौद्ध धर्माचा प्रभाव सांगतात असे सांगून या विषयावर अत्यंत माहितीपूर्ण सादरीकरण केले.
प्रख्यात कवयित्री आणि लेखिका डॉ. मंजुषा कुलकर्णी व इंग्रजी साहित्य समीक्षक डॉ. राजेश करंकाळ यांनीकलिंगमधील बौद्ध धर्म आणि ओडिया आणि मराठी साहित्याचा वारसा याला स्पर्श केला. डॉ.प्रवाकर स्वेन हे निबंधकार, समीक्षक आणि अनुवादक आहेत, त्यांनी २५ पुस्तके लिहिली आहेत आणि त्यांना २००५ मध्ये भारत सरकारचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. डॉ.स्वैन यांनी सरला साहित्य संसद आणि सरला साहित्याविषयी माहिती दिली.












