राज्यात थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील 24 तासांमध्ये राज्यातील विदर्भामध्ये तापमानात आणखी घट होणार आहे. तर कोकणपट्ट्यांमध्ये तापमानातील चढ-उतार कायम राहणार आहे.
तसेच विदर्भ मुंबई यांच्यासह राज्याच्या जवळपास सर्वच भागांमध्ये किमान तापमानात 2 ते 3 अंशांची घट नोंदवली जाणार आहे. उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे रात्रीचे तापमान 18 ते 19 अंश दरम्यान राहणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला.
दुसरीकडे आग्नेय अरबी समुद्रामध्ये असणाऱ्या मालदीव जवळ समुद्रसपाटीपासून 5.8 किलोमीटर उंचावर चक्रीय वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्याच्या काही भागांमध्ये ढगाळ वातावरण देखील असणार आहे. त्यामध्ये मध्य महाराष्ट्र, विदर्भ या ठिकाणी पहाटेच्या वेळी तापमानात मोठी घट होईल. तर कोकण आणि मुंबई या भागामध्ये रात्रीच्या वेळी तापमानात घट दिसून येईल दरम्यान थंडीचा कडाका वाढणार आहे. ही शेतकऱ्यांसाठी दिलासादायक गोष्ट आहे. रब्बी हंगामासाठी ही थंडी पोषक ठरणार आहे.












