ड्रग्ज तस्कर ललित पाटील याला ससून रुग्णालयातून पळून जाण्यास मदत करुन पोलिसांची प्रतिमा मलिन केल्याबद्दल पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी महिला पोलीस उपनिरीक्षक मोहिनी अविनाश डोंगरे आणि सहायक फौजदार रमेश जनार्दन काळे यांना पोलीस सेवेतून बडतर्फ केले आहे. ललित पाटील पलायन प्रकरणी आतापर्यंत चार जण पोलीस सेवेतून बडतर्फ केले गेले आहेत.
ललित पाटील याच्याविरुद्ध अमली पदार्थाची तस्करी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर तो ससून रुग्णालयातून पळून गेला होता. यावेळी त्याला पळून जाण्यासाठी मदत करणारे नाथाराम काळे आणि अमित जाधव यांना यापूर्वी पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. ललित पाटील याला ससून रुग्णालयातील वॉर्ड नं. १६ मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
कोर्ट कंपनीचे देखरेख अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक मोहिनी डोंगरे यांची तर, गार्ड इन्चार्ज म्हणून सहायक फौजदार रमेश काळे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली होती. ललित पाटील पळून गेला, तेव्हा हे दोघेही कामावर उपस्थित नव्हते.
त्यांनी बेकायदेशीर, बेशिस्त, बेजबाबदार व पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणारे गैरवर्तन केल्याने त्यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याप्रकरणात एकूण ११ जणांना निलंबित करण्यात आले आहे.
त्यातील चौघांना बडतर्फ केल्याने इतरांचे धाबे दणाणले आहेत.












