पुणे, दि. १९ : येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरी पर्यंतच्या मुलांच्या शाळेची वेळ बदलण्यात आली असून आता शाळा सकाळी नऊ वाजल्यानंतर सुरू होईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
याबाबत अंतिम निर्णय लवकरच घेतला जाणार असून मुलांची झोप पूर्ण व्हावी या दृष्टीने राज्यपाल रमेश बैस यांनी हा निर्णय घेतला आहे.
सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे मुलांची झोप पूर्ण होत नाही. त्यामुळे ज्यांची शाळा पहाटेची आहे त्यांना शाळेत वेळ देता येत नाही. या कारणामुळे इयत्ता दुसरी पर्यंतच्या मुलांची शाळा उशिरा सुरू करण्यात यावी असे राज्यपालांनी सरकारला सुचवले होते. राज्यपालांच्या मताशी सरकारचे एकमत झाले आहे परंतु हा निर्णय एकट्याने घेणे योग्य नाही. त्यामुळे समिती स्थापन करण्यात आली असून समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील घोषणा केली जाईल असे मत केसरकरांनी मांडले.
पण पुढील शैक्षणिक वर्षापासून सर्व शिक्षण मंडळाच्या शाळांना हा नियम लागू असेल. सकाळच्या सत्रातील शाळेची वेळ सात ऐवजी नऊ केल्यामुळे मुलांची झोप देखील पूर्ण होईल आणि त्यांच्या मनात शिक्षणाविषयी गोडी निर्माण होईल असेही ते म्हणाले.











