लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील वेहेरेगाव येथे पोलिसांनी एका मटका अड्ड्यावर कारवाई करत अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त करत, 16 जणांविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.29) लोणावळा उपविभागाचे सहायक पोलीस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली कऱण्यात आली.
दोन एजंट व मटका लावणारे 10 इसम हे ताब्यात घेण्यात आले आहेत. यावेळी तपासात चंद्रकांत देवकर, शंकर बोरकर, निलेश बोरकर, संतोष बोत्रे हे सदरचा मटका अड्डा चालवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्यसाई कार्तिक यांना गुप्त बातमीदारामार्फत अशी माहिती मिळाली होती की लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील वेहेरगाव येथे काही इसम अवैधरित्या मटका अड्डा चालवत आहेत. त्यावरून सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी त्यांच्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी पाठवले. यावेळी वेहेरगाव येथे मोकळ्या रानामध्ये एका झाडाखाली पथकाने टाकलेल्या छाप्यामध्ये मटक्याचे नंबर घेणारे दोन एजंट व मटका लावणारे 10 इसम हे ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून पोलिसांनी 2 लाख 50 हजार 485 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम चे विविध कलमान्वये वर नमूद 16 जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, सहायक पोलीस निरीक्षक सचिन राऊळ, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, भारत भोसले, पोलीस हवालदार नितेश (बंटी) कवडे, सचिन गायकवाड, अंकुश नायकुडे, पोलीस नाईक रईस मुलाणी, पोलीस शिपाई सुभाष शिंदे, होमगार्ड सागर दळवी यांच्या पथकाने केली आहे.












