
वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एक मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या आईने तब्बल सहा महिन्यांनी वाकड पोलिसात दिली. बेपत्ता होऊन सहा महिने झालेले असताना पोलिसांनी सर्व बाजूंनी तपास करत त्या मुलाचा खून झाल्याचे निष्पन्न केले. तसेच या प्रकरणी खून झालेल्या मुलाच्या दोन मित्रांना अटक केली. बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी अवघ्या 36 तासात गुन्ह्याचा छडा लावला आहे.
दिनेश दशरथ कांबळे (वय 26, रा. एकता कॉलनी, थेरगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे मित्र सिद्धांत रतन पाचपिंडे (वय 23, रा. गुरुनानक नगर कॉलनी, रहाटणी), प्रतिक रमेश सरवदे (वय 25, रा. कुदळवाडी, चिखली) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
,दिनेश हा मागील सहा महिन्यांपासून बेपत्ता आहे, अशी तक्रार त्याच्या आईने 15 सप्टेंबर रोजी वाकड पोलीस ठाण्यात दिली. दिनेश हा कोणताही कामधंदा करीत नव्हता. यापूर्वी तो तीन-चार वेळेला 10-15 दिवसांसाठी त्याच्या मित्राच्या घरी राहण्यासाठी गेला होता आणि तो परतही आला होता. यावेळी त्याने वडिलांची सोन्याची चेन न सांगता नेली. त्यावरून त्याच्या आईने त्याला जाब विचारला. त्यावर तो दोन दिवसात चेन परत आणतो, असे सांगून घरातून निघून गेला होता.घटनेचे गांभीर्य लक्षात घेत वाकड पोलिसांनी तपास सुरु केला. पोलिसांना माहिती मिळाली की, दिनेश हा 15 मार्च रोजी रात्री साडे नऊ वाजता त्याचे मित्र सिद्धांत पाचापिंडे आणि प्रतिक सरवदे यांच्यासोबत काळेवाडी फाटा येथील मोकळ्या मैदानात दारू प्यायला बसला होता. त्यावेळी त्यांच्यात भांडण झाले होते. अशी माहिती पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी दिली. त्यानंतर दिनेश कुठे गेला याबाबत मात्र पोलिसांना माहिती मिळाली नाही. सिद्धांत आणि प्रतिक यांच्यावर संशय बळावल्याने पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे












