
पुणे : विनातिकीट प्रवास करणाऱ्या ३७ हजार पेक्षा अधिक प्रवाशांवर पुणे रेल्वे विभागाने नोव्हेंबर महिन्यात दंडात्मक कारवाई करत या प्रवाशांकडून तीन कोटी नऊ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
प्रवाशांनी तिकीट काढून रेल्वेने प्रवास करण्याचे आवाहन रेल्वेकडून सातत्याने केले जाते, त्याचप्रमाणे रेल्वे विभागाकडून सातत्याने तिकीट तपासणी मोहीम सुरु असते. मात्र अनेकजण विनातिकीट प्रवास करणे पसंत करतात.
पुणे रेल्वे विभागात नोव्हेंबर महिन्यात तिकीट तपासणी दरम्यान २८ हजार ३०१ प्रवासी विना तिकीट प्रवास करताना आढळून आले. त्यांच्याकडून २ कोटी ५० लाख ६३ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
तसेच ९ हजार ३८६ जणांना अनियमित प्रवासासाठी ५८ लाख ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे, सामान बुक न करता तसेच घेऊन जाणाऱ्या २०५ जणांकडून २१ हजार २४० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.नोव्हेंबर महिन्यात तिकीट तपासणीतून पुणे रेल्वे विभागाला ३ कोटी ९ लाख ३५ हजार ८२४ रुपये उत्पन्न मिळाले. विभाग सुरू झाल्यापासून मासिक तिकीट तपासणीचे हे सर्वाधिक उत्पन्न आहे. एप्रिल २०२३ मध्ये दोन कोटी ८० लाख रुपये सर्वाधिक उत्पन्न होते. तो रेकॉर्ड मोडून नवीन रेकॉर्ड निर्माण केला आहे.
ही कारवाई विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांच्या समन्वयाने आणि विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे यांच्या नेतृत्वात तिकीट निरीक्षक आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने करण्यात आली.
रेल्वे प्रशासनाकडून अशा प्रकारे तिकीट तपासणी मोहीम सातत्याने सुरू आहे. प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा अन्यथा त्यांना रेल्वे कायद्यांतर्गत दंड भरावा लागेल. दंड न भरल्यास तुरुंगवासही होऊ शकतो, असे रेल्वे विभागाकडून आव्हान करण्यात आले आहे.












