व्यसनासाठी जमीन विक्री करण्याचा तगादा लावणार्या सख्या भावाचा खून केल्याची घटना समोर आली आहे. घोडनदी पात्रात सापडलेल्या बेवारस मृतदेहाची ओळख पटवून या खून प्रकरणाचा ग्रामीण पोलीस दलाच्या गुन्हे अन्वेषण विभागाने उघडकीस आणला आहे. याप्रकरणी तिघांना बीडमधून अटक केली आहे.
कृष्णा गोकुळ विघ्ने (वय ३२, रा. आनंदगाव, शिरुर कासार, जि. बीड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत भाऊ अजिनाथ गोकुळ विघ्ने (वय २६), काका पांडुरंग अर्जुन विघ्ने (वय ५०), साथीदार गणेश प्रभाकर नागरगोजे (वय २९, रा. एवलवाडी, ता. पाटोदा, जि. बीड) यांना अटक करण्यात आली. शिरुर तालुक्यातील पाचर्णे मळा परिसरात एका अनोळखी तरुणाचा हातपाय बांधलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह ३१ जानेवारी रोजी सापडला होता. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह घोडनदीत टाकून देण्यात आला होता. शिरुर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटली नव्हती. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्याचे चित्रीकरण तपासण्यात आले. त्यावरुन कृष्णा विघ्ने याची ओळख पटल्यानंतर तपासाला सुरुवात केली.
त्यात कृष्णा याला दारुचे व्यसन असल्याची माहिती मिळाली. पोलिसांना मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी त्याचा भाऊ अजिनाथ, काका पांडुरंग आणि गणेश नागरगोजे याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर खूनाचा प्रकार उघडकीस आला.
कृष्णा याला दारुचे व्यसन होते. तो कुटुंबात नेहमी जमीन विक्री करा असे म्हणून भांडण करत असे. या कारणावरुन आरोपींनी त्यात टेम्पोतून शिरुरला आणले. त्याचे हातपाय बांधून त्याला घोडनदी पात्रात टाकून दिले होते. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली गु्न्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे, उपनिरीक्षक गणेश जगदाळे, एकनाथ पाटील, तुषार पंदारे, जनार्दन शेळके, राजू मोमीन, अतुल डेरे, योगेश नागरगोजे, मंगेश थिगळे यांनी ही कामगिरी केली.












