अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाची उत्सुकता शिगेला पोहचली असून भाजपकडूनही जोरदार प्रचार सुरू आहे. तर, दुसरीकडे रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापणा कार्यक्रमात शंकराचार्य सहभागी होणार नसल्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. या प्राणप्रतिष्ठापणा कार्यक्रम हा हिंदू धर्मातील शास्त्र, विधींनुसार होत नाहीये, असा आक्षेप स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती आणि स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी घेतला आहे. दरम्यान शंकराचार्यांनी आक्षेप घेतल्यानंतर भाजप खासदार नारायण राणेंनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
नारायणा राणे म्हणाले, राम मंदिर एवढ्या वर्षांनंतर होत आहे, याचे त्यांना कौतुक नाही. हे आत्तापर्यंत कोणीही करु शकले नाही. हा विषय कोणीही घेतला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणि भारतीय जनता पक्षाने हा विषय घेतला. मंदिर होत आहे तर शंकराचार्यांनी शुभेच्छा द्याव्यात की त्याच्यावर टीका करावी? समाधान आहे. शंकराचार्यांनी हिंदू धर्मासाठी त्यांचे योगदान काय आहे? ते सांगावे, असा सवाल भाजप खासदार नारायण राणे यांनी केला आहे.
शंकराचार्य मोदीजींना आणि भारतीय जनता पक्षाला राजकीय दृष्ट्या पाहात आहेत. हे मंदिर राजकीय दृष्टीने होत नाही. ते धार्मिक दृष्टीने होत आहे. राम आमचा देव आहे. त्याच्यासाठी हे सर्व सुरु आहे. रामाची मूर्ती जाग्यावर येत आहे. आम्हाला दर्शन घेता येणार आहे. याचे आम्हाला समाधान आहे, असे मत नारायण राणे यांनी व्यक्त केले.












