शिंदेंच्या शिवसेनेतील माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना आपल्या पक्षात प्रवेश देऊन अजित पवार यांनी शिरूरमधून उमेदवारी दिली आहे. यामुळे भोसरीचे माजी आमदार विलास लांडे नाराज झाले आहेत. ते अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी जाणार, अशी चर्चा आहे. जर लांडे यांनी साथ सोडली तर शिरूरमध्ये अजित पवारांना मोठा धक्का बसू शकतो. लांडे यांच्याबाबत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी देखील संकेत दिले आहेत.
विलास लांडे हे शिरूर लोकसभा मतदारसंघातून लढवण्यास इच्छूक होते. आढळराव पाटीलांसारख्या आयात केलेल्या नेत्याला उमेदवारी देऊ नये, असे म्हणत त्यांनी विरोध केला होता. पण त्यांचा विरोध डावलून आढळरावांना अजित पवारांनी पक्षात घेऊन उमेदवारी दिली. यामुळे लांडे हे नाराज आहेत.
भोसरी येथे प्रचारासाठी आले असताना शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लांडे यांच्याबाबत वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, महाराजांची शिकवण आहे की ‘मोहीम फत्ते झाल्यानंतर निकाल दिसला पाहिजे, मोहिमेची वाच्यता नको’, असे म्हणत त्यांनी लांडे हे संपर्कात असल्याचे संकेत दिले. त्यामुळे लांडे हे शरद पवार गटात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.












