पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०८ : राज्यातील शेतकरी दुष्काळ, अवकाळी, गारपीट, मिचांग वादळामुळे उद्धवस्त झाला आहे. त्यामुळे प्रश्नोत्तराचा तास स्थगित करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा सुरू करण्याची आग्रही विनंती विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभा अध्यक्षांना केली. परंतु त्यांची सूचना फेटाळली गेली. त्यामुळे श्री. वडेट्टीवार आक्रमक झाले. विरोधी पक्षातील सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
श्री. वडेट्टीवार म्हणाले, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काल बांधावर जाऊन आहेत. शेतकऱ्यांची परिस्थिती त्यांच्या लक्षात आली असेल. या सभागृहाकडे शेतकरी डोळे लावून बसला आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. आज आपल्या पदरात काही पडेल, अशी त्यांची भावना आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा व्हावी. अशी मागणी त्यांनी केली होती. परंतु आजच्या कामकाजाशी हा विषय निगडित नाही. काल या विषयावर मुद्दा उपस्थित केला होता, त्यावर उपमुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले आहे. स्थगन प्रस्तावही दिला आहे. त्यामुळे विरोधी पक्षाची सूचना नाकारत असल्याचे अध्यक्षांनी सांगितले. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले.












