पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०५ : काल विधानपरिषदेच्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस होता. या अधिवेशना मध्ये आमदार सुरेश धस, आमदार प्रवीण दटके आणि आमदार सचिन आहेर यांनी श्री क्षेत्र निमगाव खंडोबाच्या विकास कामांसाठी तारांकित प्रश्न विचारून उपसभापतींचे लक्ष वेधून घेतले.
यावेळी महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री मा. श्री. गिरीश महाजन यांनी प्रश्नाचे उत्तर देत असताना श्री क्षेत्र निमगाव खंडोबा येथील स्मशानभूमीच्या संरक्षक भिंतीसाठी 20 लाख आणि रस्त्यासाठी 45 लाख असे एकूण 65 लाख रुपयाचा निधी एक महिन्यामध्ये मंजूर करून देण्याचे आश्वासन विधानपरिषदे मध्ये दिले.
ह्या विकासकामांसाठी खेड तालुक्याचे सुपुत्र राजू खंडीजोड यांनी वारंवार पाठपुरावा केल्यामुळे विकास कामांना गती प्राप्त झाली याबद्दल त्यांचे श्री क्षेत्र निमगाव खंडोबाच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने आभार मानण्यात आले.












