पुणे पोलीस आयुक्तालयातील भरोसा सेलच्या सहायक पोलीस निरीक्षक अर्चना कटके यांना बालकांच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग आणि महिला व बालविकास आयुक्तालय, युनिसेफ यांच्या वतीने ‘बाल स्नेही 2023’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
बालकांच्या सर्वांगीण विकास, बाल हक्क संरक्षण त्यांची सुरक्षा, आरोग्य इत्यादीसाठी पुणे शहर पोलीस आयुक्तालयातून एकूण 716 विधीसंघर्षित बालकांचे समुपदेशन करण्यात आले आहे. तर 2023 मध्ये 29 पीडितांना मनोधैर्य योजनेचा लाभ मिळवून दिला आहे.
पोलीस आयुक्तालयामार्फत पोक्सो मधील पीडित बालके तसेच विधीसंघर्षग्रस्त बालकांना बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळ, संस्थेत दाखल करणे किंवा त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी वाहने उपलब्ध करुन दिली आहेत.याशिवाय दोन अल्पवीन मुलांना नोकरीसाठी आवश्यक असलेले चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र प्राप्त करुन दिले आहे.












