पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करुन पोलिसांच्या सी आर मोबाईल वाहनावर दगडफेक केल्याची घटना रामटेकडी येथे घडली आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. ही घटना बुधवारी (दि.१०) पहाटे तीनच्या सुमारास रामटेकडी येथील वंदे मातरम चौकात घडली आहे. याबाबत पोलीस अंमलदार अभिजीत बाळासाहेब चव्हाण यांनी वानवडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अभिजीत अशोक काकडे (वय-१९ रा. रामटेकडी, हडपसर), बल्या गायकवाड
(रा. कृष्णानगर, कोंढवा), नितीन पाटोळे (रा. आदिनाथ बिल्डींग, रामटेकडी), महेश शिंदे, बाळा, प्यारी उर्फ प्रशांत कांबळे, पप्पुसिंग गुरबचनसिंग कल्याणी (वय-१९ रा. हडपसर) यांना अटक केली असून इतर दोन ते तीन जणांवर भा.दं.वि. कलम ३५३, १४३, १४७, १४९, ४२७, ३३६, ३४ सह महाराष्ट्र पोलीस कायदा, क्रिमीनल लॉ अमेंन्डमेंट ऍक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलीस अंमलदार अभिजीत चव्हाण व त्यांचे सहकारी सहायक पोलीस फौजदार जगताप हे भैरोबानाला परिसरात पेट्रोलिंग करत होते.
त्यावेळी एम.डी.टी.वर प्राप्त झालेल्या कॉलनुसार फिर्यादी हे रामटेकडी येथील वंदेमातरम चौकात गेले. त्यावेळी आरोपी हे गैरकायद्याची मंडळी जमा करुन रस्त्यावरचे फळ विक्रीच्या गाड्या पलटी करत होते. त्यावेळी फिर्यादी यांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता आरोपीपैकी एकाने फिर्यादी यांना ढकलून दिले. तसेच आरोपींनी त्याठिकाणी पार्क केलेल्या रिक्षा, दुचाकी, चारचाकी गाड्यांवर दगडफेक करुन दहशत निर्माण केली.
तर अभिजीत काकडे याने सी.आर. मोबाईल व्हॅनवर दगड मारुन समोरील काच फोडली. आरोपींनी फिर्यादी हे करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास वानवडी पोलीस स्टाईनचे सहायक पोलीस निरीक्षक देशमुख करीत आहेत.












