राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने येत्या १६ ते २४ डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर होणाऱ्या पुणे पुस्तक महोत्सवात सुमारे २०० स्टॉल्स राहणार असून, पुणेकरांना १० भारतीय भाषांमधील हजारो पुस्तके पाहायला आणि खरेदी करण्यासाठी उपलब्ध राहणार आहे.
या पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने पुणेकरांना प्रसिद्ध कवी कुमार विश्वास, पत्रकार सौरभ द्विवेदी, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर, लोकगीत गायक नंदेश उमप, प्रसिद्ध लेखक विक्रम संपत यांना ऐकण्याची, तर तुकाराम दर्शन महानाट्य, शिवराज्याभिषेक सोहळा अनुभवण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर युवकांना काश्मिरी बँड, उत्तर भारतीय संगीताचा आस्वाद घेता येणार असून, टॅलेंट हंटमध्ये दररोज आपल्या कला सादर करता येणार आहे.
लहान मुलांसाठी बालसाहित्यिकांकडून कथा, गोष्टी ऐकता येणार आहे. पुस्तक महोत्सवाचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे महापालिका, उच्च शिक्षण आणि शालेय शिक्षण विभाग यांनी एकत्रित केले आहे.
महोत्सवासाठी पुणे श्रमिक पत्रकार संघ सहआयोजक असून, भारतीय विचार साधना आणि खडकी शिक्षण संस्थेचे सहकार्य लाभले आहे. पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने होणाऱ्या विविध उपक्रम आणि कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याबाबत शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांना राज्य सरकारने सूचना दिल्या आहेत, अशी माहिती महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी दिली आहे.












