प्रियकराच्या मानसिक छळाला कंटाळून एका २१ वर्षीय तरुणीने राहत्या घरात्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार १६ डिसेंबर रोजी घडला असून आरोपी हा मागील अडीच ते तीन महिन्यांपासून तरुणीला त्रास देत होता. याप्रकरणी प्रियकरावर तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
अनिषा रणजीत खंडागळे (वय-२१) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. याबाबत अनिषा हिच्या आईने रविवारी (दि.२४) तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन अभिजीत अनिल राठोड (रा. सायन हॉस्पिटल कामगार चाळ, मुंबई) याच्यावर आयपीसी ३०६,५०४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या मुलीसोबत प्रेमाचे नाटक करुन तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला लग्न करण्याचे आश्वासन दिले. मात्र आरोपीने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला भेटून व फोनवरुन शिवीगाळ केली. तसेच तिचा फोन ब्लॉक करुन तिच्यासोबत बोलणे बंद केले.
आरोपी राठोड याने तरुणीचा मानसिक छळ केला. आरोपीने लग्न करण्यास टाळाटाळ केल्याने तरुणीला नैराश्य आलं. याच नैराश्यातून तरुणीने राहत्या घरी ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.












