सातारा जिल्हयातील अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्यासाठी जागरूक, सुजाण, दक्ष नागरिकांकडून आपल्या परिसरातील अवैध धंद्यांविषयी माहिती सहजरित्या विनासायास पोलीसांपर्यंत पोहचविण्यासाठी सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक समीर शेख, व अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या संकल्पनेतुन “दक्ष” व्हॉटसअप प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. “दक्ष” व्हॉटसअप प्रणालीमध्ये ९९२३२३४१०० हया क्रमांकावर नागरीकांनी सुरूवातीला Hi, Hello असे काहीही पाठविले तरी सदर प्रणाली सुरू होईल. त्यानंतर नागरीकांनी आपली तक्रार निवडावी व दिलेल्या पर्यायावर क्लीक करुन आपली तक्रार दाखल करावी.
सदर प्रणालीमध्ये नागरीकांनी तक्रार नोंदविल्यानंतर त्यांचे नाव व मोबाईल नंबर गोपनीय राहील. सदर प्रणालीचा मुख्य उद्देश हा सातारा जिल्हयातील अवैध शस्त्र, अवैध दारु, जुगार, अंमली पदार्थ, अवैध गुटखा, अवैध सावकारी व्यवसाय, अवैध वाळु वाहतुक व विक्री यांसारख्या इतर अवैध धंद्याची माहिती पोलीस यंत्रणेपर्यंत पोहचवुन अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई करणे शक्य होणार आहे.
सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सातारा जिल्हयातील सुजाण नागरीकांना या सुविधेचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन केले आहे.












