सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सने माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे नियम पाळावेत तसेच प्रतिबंधित केलेल्या कंटेंटची माहिती युजर्सना स्पष्टपणे द्यावी, अशा सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सोशल मीडिया कंपन्यांबरोबर घेतलेल्या बैठकीत या सूचना दिल्या.
आयटीच्या नियमांनुसार प्रतिबंधित केलेल्या कंटेंटबाबत नियम 31 (1)(ब) अंतर्गत युजर्सना स्पष्ट भाषेत सूचना द्याव्यात. नोंदणीच्या वेळी आणि नियमित रिमाइंडर म्हणून तसेच लॉगइनच्या प्रत्येक वेळी, प्लॅटफॉर्मवर माहिती अपलोड किंवा सामायिक करताना माहिती दिली गेली पाहिजे. आयपीसी आणि आयटी कायदा 2000 सह दंडात्मक तरतुदी काय आहेत याची माहिती सोशल मीडिया कंपन्यांनी युजर्सना स्पष्टपणे द्यावी अशा सूचना सरकारने दिल्याचे मंत्री चंद्रशेखर यांनी सांगितले.
गेल्या महिन्यात पीएम मोदींचा गरबा डान्सचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये पंतप्रधानांसारखी दिसणारी व्यक्ती काही महिलांसोबत गरबा करताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नवरात्रीत गरबा खेळतानाचा हा व्हिडिओ असल्याचे बोलले जात होते.
या दाव्याचा हा व्हिडिओ फेसबुक आणि ट्विटरवर चांगलाच व्हायरल झाला होता. यानंतर सरकारने डीपफेकबाबत अधिक गांभीर्याने कार्यवाही करण्यास सुरुवात केली. कंपन्यांची बैठक घेऊन त्यांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. आता कंपन्या या सूचनांची अंमलबजावणी कशी करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.












