पिंपरी चिंचवड : दिल्ली येथून चोरी केलेल्या महागड्या चारचाकी गाड्यांचे बनावट कागदपत्र तयार करुन महाराष्ट्रात विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाने अटक केली आहे, या टोळीकडून १ कोटी ५७ लाख रुपये किंमतीच्या ११ चारचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या टोळीमध्ये सांगली पोलीस दलात कार्य़रत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे.
अजीम सलीम पठाण (वय-३४ मु.पो. रहिमतपूर , ता. कोरेगाव जि. सातारा), शशिकांत प्रताप काकडे (वय-३० रा. मु.पो. साखरवाडी (पिंपळवाडी) ता. फलटण, जि. सातारा), राजाराम उर्फ राजू तुकाराम खेडकर (वय ३४ रा. पटवर्धन कुरोली ता. पंढरपूर जि. सोलापुर), महेश भिमाशंकर सासवे (वय-३१ रा. विजापुर रोड, सोलापूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर प्रशांत माने (रा. रहीमतपुर), विकास माने (रा. रहीमतपुर), भरत खोडकर (रा. सांगली), हाफिज (रा. मेरठ, उत्तर प्रदेश), इलियास (रा. बेंगलोर), रसुल शेख (रा. इचलकरंजी) अशी आंतरराज्यीय वाहन चोरांची टोळी निष्पन्न झाली आहे.
यातील भारत खेडकर हा सांगली जिल्ह्यातील पोलीस दलातील पोलीस शिपाई आहे. आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.दरोडा विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार हे रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेत असताना सहायक पोलीस फौजदार महेश खांडे व पोलीस हवालदार नितीन लोखंडे यांना मिळालेल्या माहितीवरुन ५ जानेवारी रोजी हिंजवडी परिसरातून अजीम पठाण व शशीकांत काकडे यांना ताब्यात घेतले. अजीम पठाण याच्याकडून चाकण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्यातील इको गाडी आणि काकडे याच्याकडून ब्रेझा गाडी जप्त केली. अजीम पठाण हा सातारा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. अजीम पठाण आणि शशिकांत काकडे या दोघांनी मिळून आंतरराज्य गुन्हेगारी टोळीच्या मदतीने परराज्यातून चोरून आणलेल्या १ कोटी ५७ लाख रुपये किंमतीच्या ११ चारचाकी गाड्या जप्त केल्या आहेत.











