सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या महिलेला तुमच्या नावाने तैवानला पाठविलेल्या पार्सलमध्ये ड्रग्ज असल्याचे सांगून भिती दाखविली. पोलीस चौकशी करीत असल्याचे भासवून व्हिडिओ कॉल करायला लावला. तिच्या नकळत तिचे सर्व अॅक्सेस स्वत:कडे घेऊन तिच्यावर नावावर १९ लाखांचे कर्ज घेऊन सायबर चोरट्यांनी फसवणूक केल्याचा नवा प्रकार समोर आला आहे. याबाबत एका ३४ वर्षाच्या महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ९१/२४) दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे पती सॉफ्टवेअर इंजिनिअर असून दोघेही नामांकित आय टी कंपनीत नोकरी करतात. फिर्यादी यांना १९ जानेवारी रोजी अनोळखी नंबरवरुन फोन आला. त्याने फेडेक्स कुरिअर कंपनीतून बोलत असल्याचे सांगून तुमच्या नावाने एक पार्सल तैवानला पाठविले आहे. ते पार्सल नार्कोटिक्स डिपार्टमेंटने पकडले असून त्यात २ किलो कपडे, ८ बनावट पासपोर्ट, ५ आयसीसीआय क्रेडिट कार्ड, ७५० ग्रॅम एमएएमडी हे ड्रग्ज पकडले आहे. त्यावर फिर्यादी यांनी हे पार्सल आपले नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी फोन नंबर, आधार कार्डचे शेवटचे चार नंबर सांगून ते कन्फर्म करण्यास सांगितले. त्यांनी ते कन्फर्म केले. त्यावर फोन करणार्याने आम्ही पोलीस तक्रार दाखल केली आहे़ असे सांगून अंधेरी पोलीस ठाण्यात फोन ट्रान्सफर करीत असल्याचे सांगितले. त्यानंतर एक महिला इंग्रजीमध्ये त्यांच्याशी बोलत होती. चौकशी करण्याचा बहाणा करुन त्यांना तुम्हाला २ वर्षाच्या सक्त कारावास, दंड, बँक अकाऊंट गोठविले जाईल अशी भिती दाखविली.
सध्या तुमची चौकशी चालू आहे. तुमचे एक वर्षाचे बँक अकाऊंट चेक करावे लागतील, असे सांगून त्यांना स्कायपे अॅप्लिकेशन डाऊनलोड करायला लावले. त्यानंतर त्यावरुन त्यांच्याशी व्हिडिओ कॉलवर संभाषण करण्यात आले. त्यांची वैयक्तिक माहिती विचारण्यात गुंतवून ठेवण्यात आले. त्यांना व्हिडिओमध्ये आधार कार्ड दाखविण्यास सांगितले. बँकेचे लॉग इन करण्यास सांगितले. व्हेरिफिकेशनचा भाग म्हणून काही रक्कम तुमच्या अकाऊंटला पाठवित आहोत, असे सांगितले. त्यांना एक रुपया ट्रान्सफर करुन व्हेरिफिकेशन करायला सांगितले. नार्कोटिक्सच्या प्रकरणात मोठी अमाऊंट ट्रान्सफर होते का तसेच तुमच्या अकाऊंटवरुन ट्रान्सफर होऊ शकते का याची आम्हाला खात्री करायची आहे, असे सांगितले.
त्यानंतर त्यांच्या बँक खात्यावर अचानक १९ लाख ४ हजार १०१ रुपये आल्याचे दिसले.
ही रक्कम तुम्ही आमच्या बेनिफिशरी अकाऊंटरवर पाठवून द्या असे सांगितले.
त्यावर फिर्यादी यांनी विचारले की बेनिफिशरी म्हणून तुम्ही माझे अकाऊंटला कसे अॅड झाला. त्यावर त्यांनी पोलीस टीमला बँकेचे अॅक्सेस असतात आणि त्याचेसाठी आमची एक टीम काम करत असते, असे सांगितले. त्यावेळी बँकेतून या महिलेला कॉल येत होते. परंतु, फिर्यादी यांना आपण अंधेरी पोलीस ठाण्याशी बोलत असल्याचे भासविले असल्याने तिने बँकेचे कॉल कट केले. या महिलेच्या सांगण्याप्रमाणे तिने हे पैसे बेनिफिशेअरी खात्यात ट्रान्सफर केली. त्यानंतर त्या महिलेने तुमचा काही या पार्सल प्रकरणात हात दिसत नाही़ केस क्लोज करण्यात आली आहे, असे सांगितले. दुसर्या दिवशी फिर्यादी यांनी बँकेत जाऊन खात्री केल्यावर त्यांच्या खात्यावर आलेली १९ लाखांची रक्कम ही पर्सनल लोन म्हणून काढल्याचे समजले. फसवणूकीचा हा नवा प्रकार समोर आला आहे. तेव्हा पार्सलमध्ये ड्रग्ज सापडले असल्याच्या फसव्या कॉलपासून सावध रहा.












