राज्य उत्पादन शुल्क एफ विभाग पिंपरी विभागाने गोवा राज्यात जाऊन गोवा पोलिसांच्या मदतीने उत्तर गोवा येथील वडावल येथे बनावट देशी दारु निर्मीतीच्या कारखान्यावर छापा टाकून पर्दाफाश केला आहे. या कारवाईत मद्य तयार करण्यासाठी लागणारा १ लाख ३४ हजार ८९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्कच्या पिंपरी विभागाला गोवा येथे तयार झालेल्या बनावट देशी दारुची आयशर कंपनीच्या दहाचाकी ट्रक मधून वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार २३ जानेवारी रोजी जुना मुंबई-पुणे हायवे रोडवरीलमामुर्डी येथे सापळा रचून दहाचाकी ट्रक (डि डि ०१ आर ९२०५) पकडला होता. ट्रकची तपासणी केली असता गोवा राज्यात निर्मित बनावट देशी दारु रॉकेट संत्रा ९० मि.ली. च्या ६० हजार बाटल्या (६०० बॉक्स) असा मुद्देमाल आढळून आला. पथकाने दारुचे बॉक्स व ट्रक असा एकूण ३६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.जप्त केलेल्या बनावट दारुच्या बाटल्यामधील दारु उत्तर गोवा जिल्ह्यातील डिचोली तालुक्यातील वडावल येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये तयार केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन विभागाच्या पिंपरी विभागाला मिळाली. त्यानुसार पथकाने गोवा येथे जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने कारखान्यावर छापा टाकून कारखाना उद्धवस्त केला. या कारवाई झुल्फिकार ताज आली चौधर (वय-६८ रा. गाझियाबाद, उत्तर प्रदेश) याला वडावल येथून तर अमित ठाकूर आहेर (वय-३० रा. बोरमाळ, पारसवाडा, जि. पालघर) याला गोवा येथून अटक केली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या कारवाईत आतापर्यंत ३८ लाख १४ हजार ८९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, संचालक,
अमलबजावणी व दक्षता सुनिल चव्हाण, विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क पुणे विभाग सागर धोमकर यांच्या आदेशानुसार पुणे विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपुत, उप अधीक्षक पिंपरी चिंचवड युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क एफ विभाग पुणे निरीक्षक दिपक सुपे, सासवड विभागाचे निरीक्षक प्रविण शेलार, दुय्यम निरीक्षक राम सुपेकर, डी. वाय गोलेकर, शीतल पवार, नम्रता वाघ, सहाय्यक दुय्यम निरीक्षक सागर धुर्वे, जवान रोहिदास गायकवाड, अतुल बारंगुळे, तात्याबा शिंदे, राहूल जौंजाळ, अशोक आदमनकर, राम चावरे, संजय गोरे यांच्या पथकाने केली. पुढील तपास निरीक्षक दिपक सुपे करीत आहेत.












