जागेवर बेकायदेशीरपणे ताबा घेत दमदाटी करुन मारहाण केल्याप्रकरणी १५ जणांवर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. हा प्रकार २८ जानेवारी २०२४ रोजी केशवनगर मुंढवा येथील सर्व्हे नं. 9/14 येथील हिस्सा नं. ५६ ते ६० येथे घडला आहे.
याबाबत पॉल फ्रॅन्सिस इंसोल (वय-५५ रा. अनंतविहार, संतनगर, लोहगाव) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन अमित अंबादास जाधव (वय-३४), प्रकाश सुरेश जाधव (वय-३४), विजय शंकर जाधव (वय-४३), तुषार राजेंद्र जाधव (वय-३४), चंद्रकांत सुरेश जाधव (वय-34), संदीप अशोक जाधव (वय-26), दिपीका रवी गायकवाड (वय-२८), सुनिता भारत गायकवाड (वय-४५), योगिता बजरंग गायकवाड (वय-२६), गौरी तुषार जाधव (वय-२५), काजल प्रकाश जाधव (वय-२६), स्नेहा चंद्रकांत जाधव (वय-२५ सर्व रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा, पुणे) यांच्यावर भा.दं.वि. कलम ४४७, ५०४, ५०६, १४३, १४७, १४९ नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या कंपनीने केशवनगर मुंढवा येथील सर्व्हे नं. ९/९४ येथील पीन्नी को ऑप. हौसिंग सोसायटीच्या मालकीची ४ एकर व शरद ३ को. ऑप हौसिंग सोसायटीच्या मालकीची ६ एकर अशी एकूण १० एकर जागा २०१४ मध्ये करारनामा करुन विकसन करण्यासाठी घेतली आहे. या जागेवर फिर्यादी यांच्या कंपनीचा ताबा आहे. आरोपींनी अनाधिकृतपणे, बेकायदेशीर जमाव जमवून कंपनीच्या वॉचमनला धमकी देऊन कंपाउंड ची साखळी व कुलूप तोडून जागेत बेकायदेशीर प्रवेश केला. फिर्यादी यांनी ही जागा आमच्या कंपनीच्या ताब्यात असताना तुम्ही असे का केले अशी विचारणा केली. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास मुंढवा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक माळी करीत आहेत.












