शहरातील अवैध धंदे पूर्णपणे बंद करण्याचे आदेश सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि पोलिस निरीक्षकांना दिले आहेत. अवैध धंदे करणाऱ्यांवर आणि ते सुरू ठेवणाऱ्यांवर अत्यंत गांभीर्याने ‘सर्जिकल स्ट्राईक करण्यात येईल.तसेच, गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी सराईत गुन्हेगारांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
सर्व पोलिस अधिकाऱ्यांना गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. खून, खुनाचा प्रयत्न आणि शरीराविरुध्दचे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी. सराईत गुन्हेगारांविरुद्ध आता वेगळ्या पद्धतीने मोहीम राबविण्यात येणार आहे. शहरात पोलिस गस्त (पेट्रोलिंग) वाढविण्यात येणार असून, त्याबाबत योग्य नियोजन करण्याबाबत सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.
शहरात मोठ-मोठे क्लब चालविणार्याची गुन्हे शाखेत परेड घेण्यात आली. आगामी काळात शहरात कुठलेही अवैध धंद्ये चालु राहणार नाहीत. एका दिवसात सर्वच प्रश्न मार्गी लावण्यासाठी माझ्याकडे काही जादूची कांडी नसल्याचे देखील आयुक्तांनी स्पष्ट केले. मात्र, पुणे पोलिसांच्या कामांमध्ये पारपदर्शकता राहणार असून परिणामकारक पोलिसींग करण्यावर आमचा भर असणार आहे असे त्यांनी सांगितले. महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून देखील पुणे पोलिस योग्य ती पावले उचलणार असून आवश्यक तिथे दामिनी पथकाची पेट्रोलिंग वाढविण्यात येणार आहे.
5 वर्षापेक्षा अधिक काळ एकाच पोलिस स्टेशन अथवा एकाच विभागात (गुन्हे शाखा / वाहतूक शाखा / विशेष शाखा / मुख्यालय) कर्तव्य बजाविणार्या पोलिस कर्मचारी तसेच अधिकार्यांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. आज-उद्यामध्ये 77 पोलिस उपनिरीक्षक आणि सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात येणार असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट सांगितले आहे.
पोलिस कर्मचारी तसेच पोलिस अधिकार्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रत्येक झोनमध्ये तसेच इतर शाखांमध्ये पोलिस आयुक्त अमितेश कुमार हे स्वतः दरबार घेणार आहेत. पोलिस कर्मचारी आणि अधिकार्यांच्या समस्या समजून घेणे देखील महत्वाचे असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
शहरात ज्या-ज्या प्रमुख चौकामध्ये वाहतूक कोंडी होते. त्याच्या वेळा काय आहेत, ती वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. त्याच संदर्भात मंगळवारी पोलिस आयुक्तालयात वाहतूक शाखेच्या अधिकार्यांची बैठक बोलाविण्यात आली आहे. वाहतूक कोंडी होणार्या प्रमुख चौकांची यादी काढून त्यावर तोडगा काढण्यात येणार आहे.
सायबर गुन्हयांची संख्या लक्षात घेता सायबर पोलिस ठाण्यात आणखी पोलिस कर्मचारी आणि अधिकार्यांची नेमणुक करण्यात येणार आहे. आऊटसोर्सिंग करून तज्ञांची मदत देखील घेण्यात येणार आहे. हे सर्व काही एकाच दिवसात होणार्या गोष्टी नाहीत. त्यामुळे या सर्व गोष्टींना काहीसा कालावधी लागणार आहे.












